स्नेहांजली

स्नेहांजली विषयी

पुस्तके किंवा प्रकाशकांना विविध पुरस्कार देणाऱ्या संस्था आहेत. अगदी राज्य सरकारही दर वर्षी विविध पुरस्कार देत असते. मात्र, एखाद्या प्रकाशकाने केवळ लेखक किंवा लेखिकांसाठी पुरस्कार सुरू करण्याचे उदाहरण तुरळक आहे. त्याचबरोबर एकदा पुरस्कार सुरू केल्यावर त्यात सातत्य ठेवणे ही दुर्मिळ बाब आहे. मात्र, ही किमया केली आहे पुण्यातील “स्नेहल प्रकाशना’चे रवींद्र घाटपांडे यांनी. खरे तर या पुरस्काराची पार्श्‍वभूमीही खूप वेगळी आहे. “स्नेहल प्रकाशना’चा व्याप सांभाळत असत रवींद्र घाटपांडे यांच्या पत्नी अंजली. मात्र, त्यांचे अचानक निधन झाले आणि रवींद्र यांना मग साऱ्या प्रकाशनाचा व्याप सांभाळावा लागला. हे सारे प्रकाशन जिच्या धडपडीमुळे व तळमळीतून उभे राहिले, तिची आठवण म्हणून मग रवींद्र यांनी त्यांच्या स्मृतीनिमित्त “स्नेहांजली’ पुरस्कार देण्यास सुरवात केली. या वर्षी या पुरस्काराला दहा वर्षे पूर्ण होत असून, या वेळचे या पुरस्काराचे मानकरी आहेत प्रा. प्र. के. घाणेकर. तीनशेपेक्षा जास्त किल्ले फिरून आलेल्या घाणेकरांनी आतापर्यंत पर्यटनावर अभ्यासपूर्ण माहिती देणारी 56 पुस्तके लिहिली आहेत. डॉ. शेषराव मोरे, प्रा. स. ह. देशपांडे, मृणालिनी जोशी आदी मान्यवरांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेला आहे. अर्थात केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम, असे या सोहळ्याचे स्वरूप नसते. त्या वेळी एक-दोन पुस्तकांचे प्रकाशन करायचे, ही घाटपांडेंची पद्धत आहे. या वेळीही हा शिरस्ता पाळला जाणार आहे. शंकरमहाराजांच्या जीवनावरील “शंकरलीला’ ही कादंबरी; तर अनिल बळेल लिखित “ज्ञानपीठ त्रिमूर्ती’ अशा दोन पुस्तकांचे या सोहळ्यात प्रकाशन होईल. याशिवाय, येत्या दोन महिन्यांत स्नेहल प्रकाशनातर्फे दहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मराठ्यांचे सेनापती महादजी शिंदे यांच्या आयुष्यावर अभिजित आंबेकर यांनी लिहिलेली कादंबरी “रणधुरंधर’, तसेच संभाजी भोसले यांची मुंबई, पुणे व नगर या तीन शहरांचा ऐतिहासिक मागोवा घेणारी तीन पुस्तके व “गड-किल्ल्यांवरील वनस्पती’ या आणखी एका पुस्तकाचा समावेश आहे.
 

      २०१६ सालचा स्नेहांजली पुरस्कार डॉ.सदानंद मोरे यांना प्रदान करण्यात आला.

पुरस्काप्राप्त मान्यवर